Subscribe Us

धोकादायक प्राथमिक आरोग्य केंद्र व निकृष्ट दर्जाच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी.


तेरणेचा छावा/धाराशिव:-
शिराढोण येथील धोकादायक प्राथमिक आरोग्य केंद्र व निकृष्ट दर्जाच्या ग्रामीण रुग्णालय बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींवर कारवाई करून गुणवत्ता लेखापरीक्षण  करा – नितीन आबा पाटील
    शिराढोण (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील धोकादायक इमारतीमध्ये सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी, अभियंते व ठेकेदार यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते नितीन आबा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या सुमारे आठ वर्षांपासून वापरण्यास अयोग्य व धोकादायक ठरलेल्या इमारतीमध्ये सुरू आहे. पूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी वापरात असलेली ही इमारत संबंधित विभागाकडून निष्कासित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतानाही त्याच ठिकाणी आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. इमारतीचे छत गळणे, भिंतींची दुरवस्था व संरचनात्मक कमकुवतपणा यामुळे रुग्ण, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
    याचबरोबर शिराढोण येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये उद्घाटनापूर्वीच गळती, तडे व भेगा पडल्याचे प्रकार समोर आले असून बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या आरोग्य प्रकल्पामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का, तांत्रिक मानकांचे पालन करण्यात आले का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे नितीन आबा पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
     या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री मा. प्रकाशजी आंबीटकर यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश देत सविस्तर अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाचे स्वतंत्र गुणवत्ता लेखापरीक्षण (Quality Audit) करून संबंधित अधिकारी, कर्मचारी, अभियंते व ठेकेदार यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याचे नितीन आबा पाटील यांनी सांगितले.
     ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही. जनतेच्या जीविताशी संबंधित कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नये आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका नितीन आबा पाटील यांनी व्यक्त केली.
     शिराढोण परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments