Subscribe Us

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन बळकटीवर भर देणार,धाराशिव जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देणार – रवींद्र पाटील


तेरणेचा छावा/धाराशिव:-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर विशेष भर देण्यात आला.
पक्ष निरीक्षक रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाईल. संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाईल.” तसेच, “पक्षात विविध ३५ सेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
     धाराशिव जिल्हा हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा जिल्हा असून, त्या विचारसरणीशी जोडलेला वर्ग पुन्हा पक्षात सक्रिय करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. “रात्रंदिवस मेहनत घेऊन पक्षाला पुन्हा उभारी देणे ही काळाची गरज आहे,” असेही ते म्हणाले.
     बैठकीच्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, जेष्ठ नेते जीवनराव गोरे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉ.अविनाश तांबारे, शहराध्यक्ष आयाज शेख,कळंब तालुकाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार,परंडा तालुकध्यक्ष किरण करळे,तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, पंचायत समिती सदस्या प्रिया अमोल घोगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. भूम तालुकाध्यक्षपदी बालाजी गटकळ, जिल्हा चिटणीसपदी आर्यन शिंदे, युवक विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी गणेश खराडे, कळंब तालुका युवक अध्यक्षपदी भीमा हगारे, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कळंब तालुका कार्याध्यक्षपदी अशोक थोरात यांची निवड करण्यात आली.
बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. श्याम अण्णा घोगरे यांनी कठीण परिस्थितीतही पंचायत समितीत यश मिळवल्याचे सांगितले. शहराध्यक्ष आयाज शेख यांनी नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्याचे आश्वासन देताना राज्यस्तरीय नेतृत्वाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. युवक नेते रणवीर इंगळे यांनी “प्रथम पक्ष आणि नंतर महाविकास आघाडी” अशी भूमिका असावी, असे मत व्यक्त केले.
महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांनी कठीण काळात पक्ष सांभाळल्याचा अनुभव मांडला, तर युवक नेते पृथ्वीराज आंधळे यांनी युवकांना अधिक संधी देण्याची मागणी केली.
जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लोकशाहीत पराभव आणि विजय हे नैसर्गिक असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील पराभवामागे विविध कारणे असून राज्यातील राजकीय घडामोडींचा त्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागावे, असे त्यांनी आवाहन केले.
जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी आघाडीच्या राजकारणामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची गरज व्यक्त केली. कार्यकर्ते तळागाळात पोहोचल्याशिवाय यश मिळणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन ॲड. अमोल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. तुषार वाघमारे यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments