तेरणेचा छावा/ धाराशिव
तुती लागवड आणि रेशीम शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. कळंब तालुक्यातील मौजे निपाणी येथे ‘महारेशीम अभियान’ अंतर्गत जिल्हा रेशीम विभाग व ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात सध्या अठराशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली असून, भविष्यात ती पाच हजार एकरांपर्यंत वाढविण्याचा मानस आहे. नरेगा, कृषी संजीवनी आणि पोखरा यासारख्या शासकीय योजनांमधून तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा रेशीम अधिकारी श्रीमती आरती वाकुरे यांनी रेशीम शेतीसाठी उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती दिली.
कोश विक्रीसाठी पाडोळी (आ.) येथील क्लस्टरधारक बालाजी पवार यांनी शेतकऱ्यांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून दिले असून, त्यामुळे स्थानिक स्तरावर बाजारपेठ निर्माण झाली आहे. तसेच कोशापासून तयार होणाऱ्या रेशीम धागा निर्मिती केंद्राचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुतीच्या काड्यांचाही उपयोग होऊन त्यांची विक्री केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रेशीम शेतीत यश मिळवण्यासाठी आळ्यांची काळजी लहान बाळाप्रमाणे घ्यावी, तसेच कर्जासंदर्भात अडचणी आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सरपंच नवनाथ निपाणीकर यांनी निपाणी गावातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून साधलेली प्रगती आणि गावाच्या विकासाची माहिती दिली. सीएसआर निधीतून एक कोटी २८ लाख रुपये मिळवून विविध विकासकामे राबविल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, जिल्हा कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा रेशीम अधिकारी श्रीमती आरती वाकुरे, कळंबचे एसडीएम गणेश शिंदे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, उप कृषी अधिकारी संदीप अडसूळ व भुजंग लोकरे, वैभव तांबारे, कृषी मंडळाधिकारी माधुरी चौगुले, सहाय्यक कृषी अधिकारी मीरा भिसे, कृषी साहाय्यक दिलीप आवाड, पाखरे, जाधव श्रीकृष्ण, पालकर मनोज, ग्राम महसूल अधिकारी नवले, बालाजी पवार, उद्योजक ओमप्रकाश उद्धव पवार, सरपंच नवनाथ गुंड, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, तुती लागवडधारक शेतकरी, ग्रामस्थ, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments