Subscribe Us

डोळ्यात चटणी,डोक्याला पिस्तूल, गळ्याला सुरा लावून पहाटे चोरीची घटना.चॅलेंज देऊन दरोडा टाकल्याचा संशय!

तेरणेचा छावा/चोराखळी:-
 येथील,कालिका  कलाकेंद्र चालक महिलेच्या घरी 6 जणांनी डोळ्यात चटणी टाकून, डोक्याला पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत  ९लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असलेले असून मोठी खळबळ उडाली आहे.
      धाराशिव साखर कारखाना चोराखळी (ता. कळंब) जवळील  रहिवासी व कालिका  लोकनाट्य कलाकेंद्राच्या सर्वेसर्वा मालकीण निर्मला मोहन जाधव (वय ४५) या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत असलेल्या त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहतात . त्यांच्यासोबत बालपणापासूनची मैत्रीण रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हेही राहत होते.
   पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील महादेव  घुले व सचिन उर्फ प्रशांत बापू पवार यांचा कलाकेंद्रावर ये–जा होता.आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर महादेव घुले याने आर्थिक उसनवारी व्यवहार न केल्यास सचिन पवार यांच्यामार्फत घरफोडीची बोलत बोलत धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळी येथील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते. रविवारी ता. २ पहाटे नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे साडेतीनच्या सुमारास निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या व चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचे जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असतानाच तोंडाला कापड बांधलेले 6 जण घरात शिरले.
     त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले,एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले,तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला. आरडाओरड केल्याने आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकली व जीवे मारण्याची धमकी दिली.
   यानंतर आरोपींनी निर्मला जाधव यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
    दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही,असे तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून येरमाळा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments