10 फेब्रुवारी २०२६ हा दिवस केवळ एक वाढदिवस नसून समाजासाठी झटणाऱ्या, तळागाळातील माणसांचे दुःख स्वतःचे समजून आयुष्य वेचणाऱ्या एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा गौरवदिन आहे. डॉ. संदीप माणिकराव तांबारे यांचा वाढदिवस साजरा करताना येडाई व्यसनमुक्ती केंद्राचा मॅनेजर या नात्याने माझ्या मनातील भावना शब्दांत मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. संदीप तांबारे सर यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. आई-वडिलांनी अपार मेहनत घेतली, स्वतःच्या सुखाचा त्याग केला; कारण एकच ध्यास होता— आपली मुले शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत. त्या आई-वडिलांच्या कष्टांची जाण ठेवून, त्यांचे स्वप्न उराशी बाळगून, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर डॉक्टर होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
मात्र पदवी मिळाल्यानंतरही संघर्ष संपला नाही. कोणतीही भक्कम पार्श्वभूमी नसताना, हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जात आपले पाय घट्ट रोवले. समाजाशी नाळ जोडलेली असल्यामुळे व्यसनाचे दुष्परिणाम—आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक—हे त्यांनी अगदी जवळून पाहिले. व्यसनामुळे उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंबे, भरकटत चाललेली तरुण पिढी पाहून त्यांच्या मनात एक ठाम निर्णय आकाराला आला— हा समाज, ही पिढी व्यसनमुक्त करायची.
ही वाट सोपी नव्हती. गेली पंधरा वर्षे तळागाळातील व्यसनी व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी अविरतपणे काम करताना त्यांनी असंख्य अडचणी, टीका, आर्थिक मर्यादा आणि मानसिक ताण सहन केला. या संपूर्ण प्रवासाचा मी स्वतः साक्षीदार आहे. कितीही कठीण प्रसंग असला, कितीही मोठी समस्या समोर उभी राहिली तरीही ती ताकदीने, संयमाने आणि प्रसंगावधानाने हाताळण्याची त्यांची क्षमता मी जवळून अनुभवली आहे.
समाजाविषयी असलेली त्यांची जाण, कळकळ आणि सेवाभाव त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो. समाजासाठी झटताना ते कधीही आपल्या कुटुंबीय जबाबदाऱ्या विसरले नाहीत. एक उत्तम डॉक्टर, एक समाजसेवक याबरोबरच ते एक जबाबदार कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व देखील आहेत. माणसातला माणूस म्हणून त्यांची ओळख ठळकपणे पुढे येते.
माणसे जोडण्याची त्यांची कला खरोखरच विलक्षण आहे. एकदा भेटलेला माणूस ते कधीच विसरत नाहीत. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करत असताना विविध अभियानांच्या माध्यमातून गावागावात, तालुक्यांत जाऊन व्यसनाधीन व्यक्तींना उपचाराच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करत आहेत.
या वाढदिवसानिमित्त मी आई येडेश्वरीच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो की “नशामुक्त भारत, सशक्त भारत” हे त्यांचे स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावे. व्यसनमुक्ती क्षेत्रातील देवमाणूस म्हणून संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात त्यांची ख्याती व्हावी, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो—हीच सदिच्छा.
शेवटी, डॉ. संदीप माणिकराव तांबारे सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा!
आपले कार्य असेच अखंड सुरू राहो.
धन्यवाद
आपलाच,
बापूराव हुलुळे
मॅनेजर
येडाई व्यसनमुक्ती केंद्र
0 Comments