Subscribe Us

उजनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा अंतर्गत वादात?



उजनी दौऱ्यात भाजप गटनेते शिंदे आणि पाणीपुरवठा सभापती  ‘आऊट’; अंतर्गत गटबाजी पुन्हा चर्चेत!
तेरणेचा छावा/धाराशिव: धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण येथे नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी उपाध्यक्ष, काही नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांसह भेट देत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. 

मात्र या दौऱ्यानंतर धाराशिव नगर परिषद सत्ताधारी भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे तसेच गटनेते अमित (भैय्या) शिंदे यांना या दौऱ्याबाबत माहिती न देताच पाहणी केली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शहराचा पाणीपुरवठा ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतो, त्या सभापतींना वगळून दौरा करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याशिवाय पाणीपुरवठा अभियंत्याऐवजी स्वच्छता निरीक्षकांना सोबत नेण्यात आल्यानेही विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नगरपरिषदेत बहुमताने सत्ता स्थापन केल्यानंतरही स्वच्छता, दुर्गंधी, लाईट व्यवस्था आणि आता पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांवरून प्रशासन व सत्ताधारी गट वारंवार चर्चेत येत आहे.
दरम्यान, या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना राजकीय गटबाजीची किनार लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments